मुंबई- ८०० वर्षांच्या श्रद्धेची परंपरा असलेली पंढरपूरची वारी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. या श्रद्धेची परंपरा असलेल्या वारीत राज्यभरातील दहा लाखांहून अधिक वारकरी दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला २१ दिवसांहून अधिक काळ पायी चालत पंढरपुरच्या विठुमाऊलीच्या मंदिरात पोहोचतात. गांधी टोप्या घातलेले पुरुष, डोक्यावर तुळस असलेल्या कुंड्या घेतलेल्या, रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या स्त्रिया, दिंड्यांचे नेतृत्व करणारे शूर घोडे, भगवे झेंडे, पालख्या, वीणा, मृदंग, ढोलकी आणि चिपळ्यांचा भक्तिपूर्ण आवाज, फुगडीची उर्जा. पांडुरंगाची भेट होणार या आनंदात ऊन-पावसाची तमा न करता नाचत, गाणी म्हणत पंढरपूरला जाणाऱ्या, रस्त्याने जाताना मोसमातील बिया रस्त्यावर पेरून प्रवास करणाऱ्या साध्या-सोप्या लोकांची अशी ही पंढरपुरची वारी अनेकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
जात-पात, पंथ, श्रीमंत-गरीब असा काहीही भेद न करता सगळे भक्त केवळ विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरकडे कूच करीत असतात. अशा या वारकऱ्यांचा हा प्रवास यापूर्वी अनेक छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यात कैद केलेला आहेच. पण हा संपूर्ण प्रवास फार कमी वेळा छायाचित्रकारांनी कव्हर केलेला आहे.
परोपकारी आणि कला संग्राहक परवेझ दमानिया आणि रतन लथ, देशभरातील नामवंत छायाचित्रकारांच्या लेन्समधून अप्रतिम छायाचित्रांच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीचा संपूर्ण प्रवास दाखवणारे ‘द ग्रेट पिलग्रिमेज, पंढरपूर’ नावाने एक प्रदर्शन भरवत आहेत.
“वारी हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि शक्तिशाली भक्तीमय प्रवास आहे. काही वर्षांपूर्वी मी वारीचा प्रवास केला आणि मंत्रमुग्ध झालो. त्या मंत्रमुग्ध क्षणांना सोबत घेऊनच मी घरी आलो. मी सतत वारीबाबतच विचार करू लागलो होतो. मग मी याबाबत रतन लथ यांच्याशी बोललो आणि आम्ही वारीबाबत काय करता येईल याचा विचार सुरु केला. तेव्हाच वारीच्या फोटोंचे प्रदर्शन भरवावे असे आम्हाला वाटले आणि आम्ही त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले. आमच्या सुदैवाने आम्हाला सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारांची एक टीम मिळाली आणि ही छायाचित्रे समोर आणता आली.” असे परवेझ दमानिया यांनी या प्रवासामागील माहिती देताना सांगितले.
प्रख्यात छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, लेन्समन शंतनू दास, महेश लोणकर, पुबारूण बसू, मुकुंद पारके, सौरभ भाटीकर, डॉ. सावन गांधी, प्रणव देव, राहुल गोडसे आणि धनेश्वर विद्या यांच्यासह सिम्बायोसिसचे प्रा. नितीन जोशी, दीपक भोसले आणि शिवम हरमळकर यांनी नामवंत छायाचित्रकारांची एक टीम तयार केली. या टीमने वारकऱ्यांच्या श्रद्धा, दंतकथा, इतिहास आणि परंपरा यांचे हे कालातीत क्षण कॅमेऱ्यात कैद केले. भक्तीरसाची ही झेप यशस्वी व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने या उपक्रमाला सहकार्य केले.
२१ दिवसांची पदयात्रा हा काही सोपा प्रवास नाही आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेची झेप पकडण्याची ही छायाचित्रे काढण्याची यात्राही सोपी नव्हती. उपलब्ध सूर्यप्रकाश किंवा संधीप्रकाशात वारकऱ्यांचे खरे मूड टिपणे सोपे नव्हते. वारकऱ्यांना पोज देण्यासही सांगू शकत नव्हतो. त्यांची प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात टिपणे म्हणजे एक आव्हान होते आणि मानसिक कणखरपणाचा कस लागत होता. या छायाचित्रकारांनी या सर्व गोष्टींवर मात करीत वारीची अप्रतिम छायाचित्रे काढली आहेत. ही फोटो डॉक्युमेंटरी वारकऱ्यांचा प्रत्येक क्षण लोकांसमोर सादर करणारी आहे.” असेही दमानिया यांनी सांगितले.
परवेझ दमानिया आणि रतन लथ यांनी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले ‘द ग्रेट पिलग्रिमेज – पंढरपूर’ हे प्रदर्शन २७ ते ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत पिरामल गॅलरी ऑफ फोटोग्राफी, एनसीपीए येथे सुरु होणार आहे.
परवेझ दमानिया आणि रतन लुथ हे भारतातील प्रख्यात छायाचित्रकारांच्या लेन्समधून पंढरपूर वारीची अप्रतिम छायाचित्रे ‘द ग्रेट पिलग्रिमेज, पंढरपूर’ या नावाने घेऊन आले आहेत